मनोगत

प्रिय मित्रांनो,
संगणक युगात ग्रामीण भागातील युवकांनी सरकारी नोकरी व स्पर्धा परीक्षेत जास्तीत-जास्त संख्येने सहभागी होण्याकरिता उपलब्ध असलेल्या संधी त्यांच्यापर्यंत पोहचवून ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग सुलभ व्हावा म्हणून अतिशय प्रतिकूल आणि कठीण परिस्थितीत ‘नोकरी मार्गदर्शन केंद्र’ ची स्थापना करत राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिलं नोकरी विषयक परिपूर्ण मराठी संकेतस्थळ विकसित करण्याचा मान आम्ही मिळविला आहेच, त्याच बरोबर बेरोजगारांच्या मदतीसाठी संपूर्ण राज्यात जवळपास सातशेच्या वर मदत केंद्राची स्थापना केली आहे. २०१३ साली लावलेल्या एका छोट्याशा रोपट्याचं आज महाकाय वटवृक्षात रुपांतर होत असून या वटवृक्षाच्या पारंब्या दिवसेंदिवस अवघ्या जगभरात पसरल्या जात आहेत. केवळ राज्य आणि देशातूनच नाही तर संपूर्ण जगभरात विखुरलेले लाखो बेरोजगार याचा लाभ घेऊन नोकरीच्या संधीच्या वाटेवर येत असून महाराष्ट्रासह बीड जिल्ह्याची स्पर्धात्मक ओळख निर्माण होताना मनस्वी आनंद होत आहे. त्यामुळे भविष्यात बेरोजगारी निर्मुलन करण्याबरोबरच बेरोजगारांना संघटीत करून न्याय मागण्यासाठी संघर्ष करण्याचा आमचा मानस आहे.

बीड जिल्ह्यात असलेल्या माजलगाव तालुक्यातील धर्मेवाडी या साधारणतः पाचशे-सहाशे लोकवस्तीच्या छोट्याशा खेडेगावात माझा जन्म झाला. आई-वडिलांचे शिक्षण चौथी पर्यंतच झाले असले तरी आपल्या तिन्ही मुलांनी खूप शिक्षण घेऊन किमान एका मुलाने तरी सरकारी नोकरी करून आपल्या जीवनाचे सार्थक करावे असे स्वप्न उराशी बाळगून अतिशय काबाड-कष्ट करून विश्वासाने झगडत आमच्या शिक्षणासाठी अटोकाट प्रयत्न करत होते. मी मात्र त्यांच्या विश्वासास पात्र न ठरता १९९३ साली दहावीच्या वर्गात अगदी काठावर पास झाल्याने आपोआपच पुढील उच्च शिक्षणाचे सर्व मार्ग स्वतःच बंद करून थेट रोजगार हमी योजनेच्या कामावर हजर होऊन पुढील शिक्षणाला रामराम ठोकला तो कायमचाच. रोजगार हमी योजनेवर काम करताना आपली दयनीय अवस्था स्वतःलाच सहन न झाल्याने सुरुवातीला माजलगाव आणि नंतर गेवराई येथे मिळेल ते काम करत असतानाच १९९७ मध्ये बीड येथील झुंजार नेता दैनिकात काम करण्याची एक सोनेरी संधी मला मिळाली. आदरणीय स्वर्गीय मोतीराम वरपे दादा यांच्या सहवासात राहून काही तरी नवीन करण्याची प्रेरणा मिळत गेल्याने २००४ साली मा. रत्नाकर वरपे यांच्या सहकार्याने ती प्रत्यक्षात उतरवून नोकरी मार्गदर्शन केंद्राची स्थापना केली. संकल्पना नवीनच असल्याने त्यावेळी अनेकांची कुचेष्टा सहन करावी लागली असली तरी आज आम्ही आकाशाला गवसणी घालण्या इतपत यश मिळविण्यात यशस्वी होत आहोत.

वयाच्या पस्तिसाव्या वर्षापर्यंत पराकोटीचे प्रयत्न करूनही दारोदार फिरताना नको वाटणाऱ्या जीवनातील झालेल्या वेदना आजही अगदी जिवंत आहेत. दहावी नंतर शिक्षण सोडण्याचा एक चुकीचा निर्णय आणि स्वतःची क्षमता कधी पडताळून पाहण्याची संधीच न मिळाल्याने ऐन उमेदीच्या काळातील तब्बल सतरा वर्ष भटकंती करण्यातच गेली. मात्र आत्मविश्वास आणि प्रयत्न नेहमीच यशाकडे घेऊन जातात अशीच माझी परिस्थिती म्हणावी लागेल. स्वतः वर विश्वास ठेवा कारण प्रत्येकालाच एक संधी मिळत असते, मात्र मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी गरज आहे ती फक्त आपल्या जिद्द, कृती आणि इच्छा शक्तीची !!

आपला
महारुद्र माडेकर
संस्थापक – नौकरी मार्गदर्शन केंद्र



IMP