नाशिकमध्ये लष्कराच्या ६३ जागांच्या भरतीसाठी २० हजार तरुण आल्यानं गोंधळ

सैन्य दलातल्या अवघ्या ६३ जागांसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून जवळपास २० हजार तरुण देवळाली कॅम्पमध्ये दाखल झाले असून तेथे दर वेळेप्रमाणे कोणतीही व्यवस्था नसल्याने त्यांना रस्त्यावरच रात्र काढावी लागली. यामुळे दाटीवाटीने चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाल्याने अखेर पहाटेपासूनच भरती प्रक्रियेसाठी प्राथमिक चाचणी सुरू करावी लागली आहे.

लष्कराच्या भरतीसाठी होणारा गोंधळ नवा नसून दरवेळी भरतीच्या वेळी अशीच स्थिती पाहायला मिळते. काही वेळा तर गर्दी नियंत्रणात न आल्याने भरतीसाठी आलेल्या युवकांवर लाठीमारदेखील केला जातो. यंदा 63 जागांसाठी भरती प्रक्रिया होत असून त्यासाठीची चाचणी आजपासून होणार असल्याने देवळाली कॅम्प, संसरी गावाच्या रस्त्यावर रात्रीपासूनच तरुणांचे लोंढे येत आहेत. राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था नसल्याने त्यांना रस्त्यावरच रात्र काढावी लागली. अनेकांनी तर रस्त्यावरच चुली पेटवल्या.

तरुणांची गर्दी वाढल्याने देवळाली कॅम्प परिसरात गोंधळाचे वातावरण असून नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांनी काठी उगारली तरी पळापळ होत असल्याचं चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे गोंधळ आणखी वाढला. यावेळी अनेक तरुण रस्त्याजवळच्या नाल्यात पडत होते. हजारो युवकांची गर्दी पाहून अखेरीस पहाटे चार वाजताच भरतीसाठी प्राथमिक चाचणी सुरू करण्यात आली आहे.

आज महाराष्ट्रातून आलेल्या तरुणांची भरती होत असून उद्या राजस्थान आणि त्यानंतर अन्य राज्यांची भरती होणार आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया चार ते पाच दिवस चालणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (सौजन्य- लोकमत)

 


Comments are closed.

Visitor Hit Counter